शनिवार, ११ जुलै, २०२०

बखर:अर्थ


'बखर' या शब्दाचा कोशातला अर्थ हकीकत, बातमी, इतिहास, कथानक,चरित्र असा आहे.. हा शब्द 'खबर' या फारशी शब्दापासून वर्णव्यत्यासाने आला असावा. बखरी ज्या काळात लिहिल्या गेल्या त्या काळात मराठी भाषेवर फारशी भाषेचे असलेले वर्चस्व लक्षात घेता वरील व्युत्पत्ती बरोबर असावी असे वाटते. वि.का. राजवाडे यांच्या मते 'बख=बकणे, बोलणें' या शब्दापासून बखर शब्द मराठीत आला असावा. राजवाड्यांना 'खबर' पासून 'बखर' ही व्युत्त्पत्ती मान्य नाही. राजवाडे म्हणतात 'बखर' हा शब्द भष् ,भख् ,बख् ,या धातूपासून निघाला आहे. तसा 'बखर' हा शब्द बख् या अपभ्रष्ट धातूपासून निघाला आहे. पूर्वी भाट लोक मोठमोठ्या वीरपुरुषांच्या 'बखरी' तोंडाने बोलत असत. त्यावरुन 'बखर' हा शब्द प्रथमतः तोंडी इतिहासाला लावू लागले आणि नंतर लेखी इतिहासालाही तो शब्द लावण्यात आला. (राजवाडे ले.सं.भा.३) या प्रमाणे 'बखर' या शब्दाची व्युत्पत्ती 'खबर' (फारशी) आणि भख् (संस्कृत) अशा दोनही शब्दापासून सांगता येते. या दोनही शब्दाचे मूळ एकच असण्याची शक्यता आहे.

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे.तो मुख्यतःदक्षिण आशियातील, विशेषकरून मराठी साहित्यातील, ऐतिहासिक साहित्यातील एक प्रकार आहे. ऐतिहासिक घडामोडी, शूरवीरांचे गुणगान, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन बखरीत वाचावयास मिळते. आजवर २०० पेक्षा जास्ती बखरी लिहिल्या गेल्या असतील. जास्तीत जास्त बखरी इ.स.१७६० आणि १८५० च्या दरम्यान लिहिल्या गेल्या आहेत.


महत्त्वाच्या बखरी

  • शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर
श्री शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर आणि भोसले घराण्याची चरितावली : दत्ताजी त्रिमल वाकेनवीस याने इ.स. १७०१ ते इ.स. १७०६ या काळात ही बखर लिहिली. फार्सी तवारिखा वाचून बखर लिहिली अशी प्रेरणा लेखकाने नोंदविली आहे. या बखरीला तो आख्यान म्हणतो. यात ९० प्रकरणे आहेत. 'पुण्यश्लोकराजाची कथा’ लेखकाने स्वप्रेरणेने लिहिली आहे. अफझलखान वध प्रसंग, आग्ऱ्याहून सुटका, इत्यादी प्रसंग त्रोटक आहेत. राज्यभिषेकाचेही वर्णन मोजक्याच शब्दात येते. जुनी सभासदपूर्व बखर म्हणून हिला निश्चितच मोल आहे. या बखरीची नवी आवृत्ती (सन २०१८) वि.स. वाकसकर यांनी संपादित केली आहे व व्हीनस प्रकाशनने प्रसिद्ध केली आहे



  • सभासद बखर
सभासद बखर : कृष्णाजी अनंत सभासद याने छत्रपती शिवाजी, संभाजी व राजारामच्या काळातही मराठेशाहीची सेवा केली. छत्रपतींच्या दरबारात विविध पदांवर त्याने काम केले होते. शिवाजींचा राज्याभिषेक पाहण्याचेही भाग्य त्याला लाभले होते. छत्रपती राजारामसोबत जिंजीला असताना राजारामच्या आज्ञेनुसार इ.स. १६९७ च्या सुमारास सभासदाने शिवाजींच्या चरित्रावर बखर लिहून काढली. या बखरीत शिवाजी महाराजांचे सुरूवातीपासून ते शेवटपर्यंतचे सर्व पराक्रम वर्णन केले आहेत. ही बखर संक्षिप्त स्वरूपात असली तरी ही शिवकाळातील बखर असल्याने तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

  • भाऊसाहेबांची बखर
भाऊसाहेबांची बखर : ही मराठी भाषेतील एक प्रसिद्ध बखर आहे. मराठी वाङ्‌मयेतिहासातील अत्यंत लालित्यपूर्ण, श्रेष्ठ वाङ्मय गुणांनी युक्त असणारी नावाजलेली बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर. बखरीच्या कर्त्याबद्दल मतभिन्नता आढळते. कृष्णाजी शामराव व चिंतोकृष्ण वळे अशी नावे अभ्यासक मानतात; परंतु कृष्णाजी श्यामराव हेच याचे लेखक असावेत असे वाटते. बखरीचा रचनाकाळ इ.स. १७६२-६३ असावा.”भाऊसाहेबांची बखर’ असे याचे व्यक्तिवाचक नामाभिमान असले, तरी ही बखर व्यक्तिकेंद्रित नाही. इ.स. १७५३ साली रघुनाथरावांनी जाटाच्या कुंभेरीवर स्वारी केली. तेथपासून इ.स. १७६१ साली पनिपतच्या दारुण पराभवाने नानासाहेब पेशवे यांचे शोकावेगाने निधन झाले व माधराव पेशवेपदी आरूढ झाले, इथपर्यंतचा इतिहास व उत्तरी भारतातील मराठ्यांच्या राजकीय घडामोडींचे सूक्ष्म व साद्यंत वर्णन यात येते. त्यातील काही वाक्ये - जैसे भडभुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडका जहाला. ”भाऊसाहेबांची बखर’ या विषयावर, याच नावाची मराठीत अनेक पुस्तके आहेत, त्यांतल्या काहींचे लेखक :

चितळे, जोशी
मु.श्री. कानडे
र.वि. हेरवाडकर
श.ना. जोशी


  • पनिपतीची बखर
पनिपतीची बखर : पनिपतच्या युद्धाचे वर्णन करणारी दुसरी बखर म्हणजे पानिपतीची बखर. लेखक रघुनाथ यादव. श्रीमंत महाराज मातु:श्री गोपिकाबाई यांच्या आज्ञेवरुन बखरीचे लेखन झाले. लेखनकाळ इ.स. १७७० च्या आसपास. या बखरीचा नायक कल्पांतीचा आदित्य-सदाशिवरावर भाऊ शिंदे-होळकरांच्या भांडणाला स्पष्ट उत्तर देणारा हा नायक, विश्वासरावाला गोळी लागताच गहिवरून येणारा भाऊ येथे दिसतो. भाऊसाहेबांची विविध रूपे लेखक चितारतो. युद्धवर्णनात त्यांचा हातखंडा आहे. वर्णनप्रसंगी तो रामायण महाभारताच्या उपमा वापरतो. निवेदनशैली, भाषा हुबेहूब वर्णन यात लेखक वाकबगार आहे. पनिपत ही मराठ्यांच्या इतिहासातील एक शोककथा आहे, आणि या शोककथेचा शोकात्म प्रत्यय बखरीत मिळतो हेच तिचे यश आहे. असे या बखरीबद्दल म्हटले जाते.

  • सप्तप्रकरणात्मक बखर
सप्तप्रकरणात्मक बखर : ही शिवाजीच्या चरित्रावर आधारित मल्हार रामराव चिटणीसविरचित सप्तप्रकरणात्मक बखर उत्तरकालीन आहे. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे लोभस आदर्श राजा, महापुरुष म्हणून वर्णन केलेले आहे. शिवरायांचे संगीत-नाट्य, कलाकुशल व्यक्तिमत्त्वाचा; पराक्रमी, तेजस्वी राजा म्हणूनही परिचय होतो. बखरकाराने सुभाषितांचाही वापर केला आहे. मानवी स्वभावाचे विविध नमुने त्यांनी सादर केले आहेत. तत्कालीन लोकस्थितीचेही दर्शन या बखरीत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपया आपल्याला काही शंका असल्यास कृपया मला कळवा

क्यू पाटील, और लडोगे ?

इसवी सन १७६०! मराठ्यांच्या दिग्विजयी फौजांनी नुकताच अफगाणिस्तानातल्या खैबरखिंडीत राहणाऱ्या कडव्या पठाणांचा समाचार घेतला होता.मराठा साम्राज्...