इसवी सन १७६०! मराठ्यांच्या दिग्विजयी फौजांनी नुकताच अफगाणिस्तानातल्या खैबरखिंडीत राहणाऱ्या कडव्या पठाणांचा समाचार घेतला होता.मराठा साम्राज्याचा विस्तार अखंड हिंदुस्थानात पसरू लागला होता आणि लाहोरचा बंदोबस्त केल्यानंतर तर मराठ्यांचा राजा दिल्लीवर राज्य करणार हे जवळजवळ पक्के होते.
आशिया खंडातल्या मुस्लिमांच्या सार्वभौम सत्तेचे केंद्र असणारी दिल्लीची गादी आता मराठ्यांच्या वर्चस्वाखाली येणार हे ओळखून नाजीबखान रोहिल्याने दुराणी बादशहा अहमदशहा अब्दाली सकट इतर सर्व मुस्लिम राजांना इस्लामी सत्तेच्या रक्षणासाठी एकत्र येण्यासाठी खलिते पाठवून विनंत्यांचा रतीब घातला होता.सर्वांनी एकत्र येऊन मराठा फौजेच्या तुफानाला रोखले नाहीतर दिल्ली मराठ्यांची आणि अखंड हिंदुस्थान याची जाणीव परकीयांना झाली होती.येत्या काही काळात दिल्लीच्या क्षितिजावर युद्धासाठी सज्ज झालेल्या घोड्यांच्या टापांच्या धुळीचे लोळ पाहायला मिळणार हे आता जवळजवळ पक्के होते.भारताच्या उत्तरेत शिंदे, होळकर आदी घराण्यांकडे उत्तर हिंदुस्थानातील मराठा साम्राज्यची जबाबदारी होती , याच काळात उत्तरेत ग्वाल्हेर येथे शिंदे तर इंदौर येथे होळकर या मराठ्यांच्या दोन वतनदार सरदारांनी संपूर्ण उत्तर भारताचा प्रदेश आपल्या टाचेखाली ठेवला होता.शिंदे घराण्यातील दत्ताजी शूर होता. अब्दालीने दिल्ली लुटल्यानंतर (१७५७) मराठा साम्राज्याचे मुख्य छत्रपतींच्या आदेशाखाली सूत्र हलवणाऱ्या पेशव्यांनी त्यास उत्तर हिंदुस्थानचा कारभार सुधारण्याचा आदेश दिला. त्याच्यावर नजीबखानाचे पारिपत्य, लाहोरचा बंदोबस्त, तीर्थक्षेत्रे मुक्त करणे आणि बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी पैसा उभा करणे इ. जबाबदाऱ्या दत्ताजींवर सोपविण्यात आल्या.
१७६० सालच्या मकरसंक्रांतीचा दिवस. नजीबचे पारिपत्य करण्याच्या आणि लाहोर सोडवण्याच्या पेशव्यांनी सोपविलेल्या कामगिरी पार पडण्यासाठी दोघे काका-पुतणे उज्जैनहून निघून दिल्लीस आले.
" दत्ताजी मनावर घेतलेले काम पार पाडील '’ असा पेशव्यांचा आढळ विश्वास होता. १७५८ साली दत्ताजीने लाहोर घेतले आणि नाजीबाचा बिमोड करण्यासाठी यमुनाकाठी रामघाट येथे दाखल झाला.
१० जानेवारी. सकाळचे स्नान आटोपून मराठी फौज तयारीनिशी उभी होती. सेनापती युद्धाचा मुकाबला निश्चीत करण्यासाठी यमुनेचा ठाव घेऊ लागले पण तो काही लागेना.हे चालू असतानाच शत्रूचे सैन्य नदी उतरून अलीकडे येऊन थेट हल्ले करू लागले. हे पाहून दत्ताजी चिडला. त्याच्या डोळ्यात युद्धाचा अंगार फुलू लागला. जणूकाही तो याच क्षणाची वात पाहत होतं.
क्षणाचाही विलंब न करता दत्ताजीने आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. आणि एका तुकडीच्या सोबत त्याने आपल्या सजवलेल्या लाल्मानी घोड्यावर मजबूत मंद टाकत रणांगण जवळ केले.
मागचे मराठी सैन्यही त्वेषाने रणांगणाच्या दिशेने झेप घेऊ लागले. नजीब आणि गीलच्यांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी मराठी सैन्य आसुसले होते.
हर हर महादेव ची गगनभेदी गर्जना करत मराठी सैन्य शत्रूला भिडले. रणांगणावर तलवारीच्या खणाखनीने, घोड्यांच्या खिकाळ्यानी आणि वीरांच्या घोषणांनी नुसता हाहाकार माजवला.
एका प्रहारापुर्वी निपचित पडलेल्या घाटाचे रूप पार पालटून गेले. मराठ्यांकडे बंदुका नव्हत्याच. त्यात अब्दालीचे सैन्य म्हणजे ताज्या दमाचे अफगाण पठाण.
त्यांच्या बंदुकीच्या माऱ्यापुढे तलवारीने लढणारे मराठे किती काल तग धरणार? एक एक मराठा सैनिक बंदुकीच्या गोळ्यांनी जायबंदी होऊ लागला. मराठ्यांच्या प्रेतांचा नुसता खच घाटात पसरलेला दिसू लागला.
पण दत्ताजीला तर फक्त समोर येणारा अफगाण आणि त्याची मुंडी दिसत होती. त्याची तलवार विजेसारखी चालत होती.
ही पड कमी होती की काय म्हणून दोन धक्कादायक खबरी घेऊन शिपाई दत्ताजींकडे धावत आला. मालोजी फौजेसह मराठ्यांच्या मुडद्यांच्या राशीत दिसेनासा झाला होता आणि गनिमांनी एकाच वेळी तिन्ही बाजूंनी हल्ला केला होता.
रणमदाने बेहोष झालेल्या दत्ताजीने पुन्हा लालमणीला टाच दिली. हातात तळपती तलवार, पाठीवर ढाल आणि शिरावर शिरस्त्राण घेतलेल्या दत्ताजीचा रणमर्द अवतार पाहून मराठी सैन्यात पुन्हा नवे स्फुरण चढले.
तलवारीच्या प्रत्येक घावासरशी यवनाचे मुंडके धडावेगळे होत होते. शीर नसलेल्या धडातून रक्ताच्या धारा बरसत होत्या. दत्ताजीची तलवार गनिमांना मराठ्यांच्या शौर्याची ओळख पटवून देत होती.
बऱ्याच वेळापासून जरीपटक्याजवळ निकराने गिलच्याना पाणी पाजत असलेल्या जनकोजीच्या दंडावर गोळी लागली आणि तो घोड्यावरून खाली कोसळला. ही बातमी दत्ताजीला पोचवण्यात आली.
हे ऐकून सुडाने लाल झालेला दत्ताजी दिसेल त्या आफ्गानाच्या बरगडीत तलवार खुपसू लागला. जय भवानी जय जगदंब च्या नावाचा जयघोष करत रणांगणात त्याने मृत्यूचे तांडव माजवले.
इतक्यात हाकेच्या अंतरावर लढत असलेला नजीब त्याला दिसला. कानाच्या पाळ्या तप्त झाल्या. छातीवरची बाराबंदी ताठ झाली. बाहू स्फुरण पावू लागले. वाटेत दिसेल त्या अफगानाचे शीर धडावेगळे करत दत्ताजी नाजीबाकडे झेपावला.
इतक्यात कुठूनतरी जम्बुरक्याचा गोळा धडधडत येऊन दत्ताजीच्या बरगडीला छेदत लालमनीच्या पाठीवर पडला तसा दत्ताजी घोड्यावरून जमिनीवर कोसळला.
हे दृश्य पाहताच नजीब आणि कुतुबशहा सैतानासारखे दत्ताजीकडे झेपावले. दत्ताजी तलवार उचलण्यासाठी धडपडत असल्याचे पाहून कुतुबशहाने त्याचे डोके हातात घेतले. डोळ्यासमोर भला नाचवत म्हणाला,
“क्यू पाटील, और लडोगे?”
हे ऐकताच उरलेली ताकद ऐकवतात रणशूर दत्ताजीने वाघासारखी डरकाळी फोडली,
“क्यो नही, बचेंगे तो और भी लडेंगे!”
दक्षिणेत निजामाला आणि उत्तरेत अब्दालीला पाणी पाजणार्या मराठा वीराची ती डरकाळी कानावर पडताच कुतुबशहा दत्ताजीच्या जखमी शरीरावर मांड ठोकून बसला आणि त्याच्या छातीची नुसती चाळण करू लागला.
अंगात भूत शिरल्याप्रमाणे नजीबाने हातातला जमदाडा दत्ताजीच्या मानेवर घातला आणि त्याचे शीर धडावेगळे केले.
दत्ताजीचा देह हळूहळू रक्ताने माखत थंड पडू लागला. एका गिलच्याच्या हातातला भाला हिसकावून घेत नजीबाने त्यावर दत्ताजीचे शीर खोवले आणि बेभान होऊन मैदानात नाचवू लागला.
दत्ताजीची अवस्था पाहणाऱ्या मराठा सैन्याला अभय द्यायचे सोडून त्यांच्या कत्तलींचा आदेश देऊन तसाच नाचत अब्दालीकडे निघून गेला.
दत्ताजी पडले! मराठ्यांच्या त्रिखंडात गाजलेल्या दिग्विजयी सैन्याचा हारीचा मोहरा निखळला. बुराडी घाटातल्या धरणीला काळजाचा ठोका चुकल्यासारखे वाटू लागले.
यमुनेच्या प्रवाहाला क्षणभर थांबल्यासारखे वाटले. हे विद्रूप दृश्य पाहत असलेले अफगाणी देखील स्तब्ध झाले.
शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निश्चय तिळमात्र ढळू न देता बुराडी घाटाला दत्ताजीने रक्ताचा अभिषेक घातला. तो दिवस म्हणजे १० जानेवारी १७६०.
पानिपतच्या युद्धात मराठे हरले हा इतिहास आहे. पण ताज्या दमाच्या अफगाणी फौजांपुढे परमुलखात जाऊन मराठी फौजांनी अतुलनीय शोर्य गाजवले आणि मराठी माणसाच्या लढवय्या बाण्याचे दर्शन शत्रूला घडवले हे नाकारून चालणार नाही.
म्हणूनच कित्येक इतिहासकारांनी पानिपतचे वर्णन “पराजयातला असामान्य विजय” असे केले आहे.
काळ मागे पडत राहील, पण इतिहासात पाहिलं तर मराठी माणसाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दाखवलेलं असामान्य धैर्य नव्या पिढीला कायम प्रेरणा देत राहील…
बुराडी घाटाच्या त्या धरणीमातेला स्वतःचा ठोकाच जणू चुकल्यागत वाटू लागले.... नदीच्या पाण्याला दिशा सैरभैर वाटू लागली... अवतीभवतीच्या झाडाला, पानांना कंठ दाटून आला....हे भयावह दृश्य पहात असलेले अफगाणी गिलचे देखील स्तब्ध झाले..
आपल्याच स्वतःच्या धरणीवर या मर्द मराठ्याने बुराडी घाटाच्या त्या रणांगणावर रक्ताचा अभिषेक केला....
पण निश्चय मात्र तिळमात्र ढळू दिला नाही.. ना माघार घेतली ना नुसता माघार घेण्याचा विचार केला....
अशा नरपुत्राला, रणमर्दाला, मर्द मराठ्याला, सह्याद्रीच्या ढाण्या वाघाला, आम्हां तमाम मावळ्यांचा त्रिवार मुजरा...
"दत्ताजी आमचा जीव जाईल... कदाचित चंद्रतारेही नष्ट होतील... परंतु आपल्या अतुलनीय अनाकलनीय साहसाला बलाक पराक्रमाला हा बुराडी घाटच काय पण आम्ही असंख्य मावळे आम्ही मराठे कधीही विसरू शकणार नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
कृपया आपल्याला काही शंका असल्यास कृपया मला कळवा